*****************************************************************
घड्याळाचा काटा हा निरंतर सोबती,
धावपळ पुजलेली पाचवीला,
असेच वर्षामागुनी वर्ष सरती,
तरी सवड न मिळे पामराला !
लोकल,बेस्ट च्या रणभूमीवर,
रोज वीरश्रीने हा लढे,
वार झेली निधड्या छातीवर,
तेंव्हा कुठे उत्पन्न पदरी पडे.
उन्हाळ्यात दमटपणा जीव घेई,
पाणीकपातीची तलवार टांगे मानेवरी,
विनवी पावसा “लवकर येई”,
घाम ओथंबे सर्वांगावरी.
पावसात येई महापूर,
वर होती ट्रेन चे वांदे,
कधी उपटे साथींचा असुर,
तरी सर्व लढती – खांद्याला लावुनी खांदे !
रिक्क्षा,टॅक्सी वाले करती मिजास,
BMC,MMRDAची बेबंदशाही,
सर्वांची अंती झळ ह्यास,
“Adjust” करण्याशिवाय गत्यंतर नाही !
पेट्रोल चा उडो भडका,
वा होम-लोन चे वाढोत दर,
जरी होई जवळ-जवळ कडका,
तरी निभावे असा हा बिलंदर!
Mall,multiplex ची वरचेवर वारी,
एखाद-दुसरी सहल वर्षाकाठी,
McD,Domino’s ला नित्य हजेरी,
एवढेच काय ते विरंगुळ्यासाठी.
संप पुकारती भ्रष्ट राजकारणी
वाहतूक रोखती कोणी षंढ,
बॉम्बस्फोट पडले अंगवळणी,
पण करवत नाही ह्यास बंड !
सरीतेप्रमाणे वाहत जाणारा,
प्रतिदिन करी कसरत तारेवर,
गर्दीतही अस्तित्व राखणारा,
असा हा मध्यमवर्गीय मुंबईकर.