स्वराज्य

 एका सामान्य पण डोळस भारतीयाने पोटतिडीकेने खरडलेले शब्द !
जय हिंद !
*****************************************************************
पारतंत्र्याचे जोखड – का आले पाठीवरी ?
दूरदृष्टी आम्हास लाभली नाही,
बसती सर्व एकमेकांचा उरावरी,
उंबरठ्यापलीकडे कर्तव्य नाही.

धनसंपन्न देशास भीक लागली,
भाषा झाल्या गलितगात्र,
सारासार-संस्कृतीस कीड लागली,
स्वाभिमान उरला नाममात्र.

दास्यत्वाच्या अंधःकाराचे,
तिमिरभेदी ते क्रांतिकारी,
मेरुमणी ते बलिदानाचे,
तेज:पुंज सूर्यकिरणापरी.

अहिंसेचा महाउद्रेक जाहला,
भ्रमिष्टांचे पुढारी जाहले,
सत्यास असत्याचा रोग जाहला,
विवेक सर्वांचे क्षीण जाहले.

फोफावली जाती-धर्माची विषवृक्षवल्ली,
(ना)पाकिस्तान चा भस्मासूर उदयास आला,
खुर्च्या उबवणाऱ्या सर्वत्र वल्ली,
कर्तव्यबुद्धीचा ऱ्हास जाहला.

अवजड शृंखला दास्यत्वाच्या ,
तुटल्या महायुद्धाच्या आघाताने,
बळावरच खड्ग-ढालीच्या,
आले स्वातंत्र्य ओघाने.

इंग्रजी जळवांच्या स्थानावरी,
स्वदेशी बांडगुळे विसावली,
आर्थिक विषमता आणि बेकारी,
सामान्यांची स्थिती खालावली.

काही मुठभर नेत्यांनी,
निश्चित धमक दाखविली,
त्या बळावरच बुद्धीजीवींनी,
समर्थ भारताची मुहुर्तमेढ रोवली.

खरी दौलत म्हणजे शेती,
ह्याचा आता विसर पडला,
शहरीकरण म्हणजे प्रगती,
महागाईचा वारू उधळला.

अन्न-वस्त्र-निवारा-शिक्षण,
वैद्यकीय सेवा आणि निवृत्ती,
सामान्यांचा मागे हीच भुणभुण,
झाली उदासीन मनोवृत्ती.

दहशतवादचा नरकासुर,
करी रक्तपात नेमाने,
डाव्यांचा अतिरेकाचा असुर,
करी शक्तिपात जोमाने.

राज्यकर्ते सर्वच भ्रष्ट,
कशाचीच त्यास चाड नाही,
राजकारण झाले क्लिष्ट,
देशास दिशा अशी काहीच नाही.

शस्त्रास्त्रे आम्ही विकत घेतो,
जुनी-पानी आणि तिप्पट भावात,
पाश्चात्यास उरावर घेवूनी नाचतो,
वर त्याची शेखी मिरवितो तावात.

उठा बांधवांनो – प्रयास करूया वेळेत,
यशवंत होण्याची सर्व सामग्री,
आहे भरपूर आपल्याच अंगणात,
फक्त बनुया निग्रही.

नका निवडू समाजकंटक,
धरा नकारात्मक मतदानाचा आग्रह,
जे कायदे अपायकारक,
बदल आणा त्यात आमूलाग्र.

ढोरे नकोत विचारी हवेत,
शिक्षणाने धरावी ज्ञानाची कास,
घेवू संशोधन आणि तंत्रज्ञान कवेत,
नको कुणाची भीक-मिजास.

उदो-उदो नको नुसता,
हाराकिरी आम्हास आहे त्याज्य,
कंबर प्रत्येकाने कसता,
येईल नि:संशय स्वराज्य !

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.