रामदासांची हनुमानगाथा
हनुमानास नुसते वेशीवर न ठेवता मराठी जनमानसात स्थापण्याचे काम केले ते समर्थांनी(रामदास). मारुतीस्तोत्र, मारुतीची आरती(इतर अनेक देवतांच्या लोकप्रिय आरत्या समर्थांनी रचल्या) अनेक शतके महाराष्ट्रात घरोघरी मुखोद्गत आहेत.समर्थांच्या अफाट वाङ्मयात हनुमानाचे वर्णन अनेक ठिकाणी आढळते. ते एका संकेतस्थळावर असावेत ही इच्छा.
जय जय रघुवीर समर्थ!
हनुमंत आमुची कुळवल्ली । राममंडपी वेली गेली । श्रीराम भक्तीने फळली । रामदास बोले या नावे ।।१।।
आमुचे कुळी हनुमंत । हनुमंत आमुचे मुख्य दैवत । तयावीण आमुचा परमार्थ । सिद्धी न पडे सर्वथा ।।२।।
साह्य आम्हासि हनुमंत । आराध्य दैवत श्री रघुनाथ । गुरू श्रीराम समर्थ । उणे काय दासासी ।।३।।
दाता एक रघुनंदन । वरकड लंडी देईल कोण ।
तया सांडोनि आम्ही जन । कोणाप्रती मागावे ।।४।।
म्हणोनी आम्ही रामदास । रामचरणी आमुचा विश्वास । कोसळोन पडो रे आकाश । आणि काचि वास न पाहू ।।५।।
स्वरूप संप्रदाय अयोध्यामठ । जानकीदेवी श्रीरघुनाथ दैवत ।
मारुती उपासना मार्ग नेमस्त । वाढविला परमार्थ रामदासी ।।६।।