रामदासांची हनुमानगाथा
हनुमानास नुसते वेशीवर न ठेवता मराठी जनमानसात स्थापण्याचे काम केले ते समर्थांनी(रामदास). मारुतीस्तोत्र, मारुतीची आरती(इतर अनेक देवतांच्या लोकप्रिय आरत्या समर्थांनी रचल्या) अनेक शतके महाराष्ट्रात घरोघरी मुखोद्गत आहेत.समर्थांच्या अफाट वाङ्मयात हनुमानाचे वर्णन अनेक ठिकाणी आढळते. ते एका संकेतस्थळावर असावेत ही इच्छा.
जय जय रघुवीर समर्थ!
भुवनदहन काळी काळ विक्राळ जैसा |
सकळ गिळित ऊभा भासला भीम तैसा |
दुपटत कपि झोंके झोंकली मेदनी हे |
तळवट धरि धाकें धोकली जाउं पाहे ||१||
गिरिवरूनि उडाला तो गिरी गुप्त जाला |
घसरत दशगावे भूमिके माजि गेला |
उडति झडझडाटें वृक्ष हे नेट पाटें |
पडति कडकडाटें आंग वातें धुधारें || २ ||
थरथरित थरारी वज्र लांगुळ जेंव्हा |
गरगरित गरारी सप्तपाताळ तेंव्हा |
फणिवर कमठाचे पुष्टिसीं आंग घाली |
तगरित पवनाची झेप लंकेसी गेली ||३||
धरकत धरणी हे हाणतां वज्र पुछें |
रगडित रणरंगी राक्षसें तृणतुछें |
सहज रिपुदळाचा थोर संव्हार केला |
अवघड गड लंका सीघ्र जाळूनि आला ||४||
सहज करतळें जो मेरूमांदार पाडी |
दशवदन रिपु हे कोण किती बराडी |
अगणित गणवेना शक्ति काळासि हारी |
पवनतनुज पाहो पूर्ण रुद्रावतारी |५||