रामदासांची हनुमानगाथा
हनुमानास नुसते वेशीवर न ठेवता मराठी जनमानसात स्थापण्याचे काम केले ते समर्थांनी(रामदास). मारुतीस्तोत्र, मारुतीची आरती(इतर अनेक देवतांच्या लोकप्रिय आरत्या समर्थांनी रचल्या) अनेक शतके महाराष्ट्रात घरोघरी मुखोद्गत आहेत.समर्थांच्या अफाट वाङ्मयात हनुमानाचे वर्णन अनेक ठिकाणी आढळते. ते एका संकेतस्थळावर असावेत ही इच्छा.
जय जय रघुवीर समर्थ!
मारुतीच्या भूपाळ्या
उठिं उठिं बा बलभीमा
उठिं उठिं बा बलभीमा |
सख्या सुंदर गुणसीमा |
अंतरी धरुनियां प्रेमा |
उठवी अंजनी माता ||ध्रु.||
पूर्वदिशेप्रति भानू उदय करूं पाहे |
कमलदळी भ्रमरालागी सुटका होत आहे |
निबिड बनाचे ठायीं कोकिळा मंजुळ बोभाये |
चरावया चालले पक्षी मार्गि उभे आहे ||१||
गंगाद्वाराप्रति मुनिजन चालले स्नाना |
ब्रह्मगिरीच्या शिखरी जाती निज तपाचरणा |
साधकजन पातले सख्या तुझिया दर्शना |
तयांप्रति दे भेट वायुनन्दना ||२||
सकळही वानरगण जाहले तुझे भोवती गोळा |
चिमणालीं लेकुरें उठती गोळांगुळमेळा |
तुझिया योगे शोभा दिसती कपिकुळा |
सत्वर जागा होई माझ्या तान्ह्या बाळा ||३||
ऐकूनियां वचनाते आरोळीया देऊनियां मोठी |
उठलासे हनुमान प्रेमें टाळया पीटी |
निरंजन सुखध्यान गोदेच्या तटीं |
सद्गुरूनाथ शोभत आहे पंचवटीं ||४||
उठिं उठिं बा मारुति
उठिं उठिं बा मारुति |
उठवी अंजनी माय |
प्रभात जाली बापा |
रामदर्शना जाय ||ध्रु.||
उठिं सूर्योदय जाहला |
राम सिंहासनी बैसला |
तुज वांचुनि खोळंबला |
उठिं वा सत्वर मारुति ||१||
राम सीता लक्ष्मण |
भरत आणि शत्रुघ्न |
तुझे इच्छिती आगमन |
नळ नीळ अंगद ||२||
सुग्रीव वानरांचा राजा |
भक्त विभिषण तुझा |
जांबुवंत वसिष्ठ बोजा |
ब्रह्मनिष्ठ नारद ||३||
अवघे मिळोनि वानर |
नामे करिती भुभुःकार |
दास म्हणे निरंतर |
सदा स्मरा मारुति ||४||
उठा प्रातःकाळ झाला
उठा प्रातःकाळ जाला |
मारुतीला पाहूं चला |
ज्याचा प्रताप आगळा |
विरंचीही नेणतो ||ध्रु.||
आमुचा हनुमंत साहाकारी |
तेथे विघ्न काय करी |
दृढ धरा हो अंतरीं |
तो पावेल त्वरित ||१||
आमुचा निर्वाणीचा गडी |
तो पावेल सांकडी ||
त्याचे भजनाची आवडी |
दृढ बुध्दी धरावी ||२||
थोर महिमा जयाची |
कीर्ती वर्णावी तयाची |
रामीरामदासाची |
निकट भक्ति करावी ||३||