मारुती स्तोत्रे: भाग-१

रामदासांची हनुमानगाथा

हनुमानास नुसते वेशीवर न ठेवता मराठी जनमानसात स्थापण्याचे काम केले ते समर्थांनी(रामदास). मारुतीस्तोत्र, मारुतीची आरती(इतर अनेक देवतांच्या लोकप्रिय आरत्या समर्थांनी रचल्या) अनेक शतके महाराष्ट्रात घरोघरी मुखोद्गत आहेत.समर्थांच्या अफाट वाङ्मयात हनुमानाचे वर्णन अनेक ठिकाणी आढळते. ते एका संकेतस्थळावर असावेत ही इच्छा.

जय जय रघुवीर समर्थ!

स्तोत्र पहिले

भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती |
वनारी अंजनीसुता रामदूता प्रभंजना || १ ||

महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे |
सौख्यकारी दुखःहारी धूर्त वैष्णवगायका || २ ||

दीनानाथा हरीरूपा, सुंदरा जगदांतरा |
पाताळदेवता हंता भव्यसिंदूरूलेपना ||३ ||

लोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना |
पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका || ४ ||

ध्वजांगे उचली बाहो, आवेशे लोटला पुढे |
काळाग्नी काळरुद्राग्नी देखतां कांपती भयें ||५ ||

ब्रहमांडे माईलें नेणों, आवळे दंतपंगती |
नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भृकुटी ताठिल्या बळें || ६ ||

पुच्छ ते मुरडिले माथा किरीटी कुंडले बरीं |
सुवर्ण कटी कांसोटी, घंटा किंकिणी नागरा || ७ ||

ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपातळू |
चपळांग पाहता मोठे महाविद्युल्लतेपरी||८ ||

कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे |
मंद्राद्री सारखा द्रोणू क्रोधे उत्पाटिला बळे ||९ ||

आणिला मागुती नेला आला गेला मनोगती |
मनासी टाकिले मागे गतीसी तुळणा नसे || १० ||

अणूपासूनि ब्रहमाण्डा एवढा होत जातसे |
तयासी तुळणा कोठे मेरुमंदार धाकुटे ||११||

ब्रहमाण्डाभोवते वेढे वज्रपुच्छे करू शके |
तयासी तुळणा कैची ब्रहमाण्डी पाहता नसे|| १२ ||

आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा |
वाढता वाढता वाढे भेदिले शून्यमंडळा || १३ ||

भूत प्रेत समंधादि रोग व्याधी समस्तिी |
नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने || १४ ||

हे धरा पंधरा श्लोकी लाभली शोभली बरे |
दृढ देहो निःसंदेहो संख्या चंद्रकळा गुणे || १५ ||

रामदासी अग्रगण्यू कपिकूळासि मंडणू|
रामरूप अंतरात्मा दर्शने दोष नासती || १६ ||

स्तोत्र दुसरे

जनी ते अंजनी माता | जन्मली ईश्वरी तनु |
तनु मनु तो पवनु | एकचि पाहता दिसे || १ ||

त्रैलोक्यीं पाहता बाळें | ऐसें तो पाहता नसे |
अतूळ तूळना नाहीं | मारुती वातनंदनू || २ ||

चळे ते चंचले नेटे |बाळ मोवाळ साजिरे |
चळताहे चळवळी | बाळ लोवाळ गोजिरें || ३ ||

हात कि पाय कि सांगों | नखे बोटे परोपरी |
दृष्टीचे देखणे मोठे | लांगूळ लळलळीतसे || ४ ||

खडीखारी दडे तैसा | पीळ पेंच परोपरी |
उड्डाण पाहता मोठे | झेपावे रविमंडळा || ५ ||

बाळाने गिळीला बाळू |स्वभावे खेळता पाहता |
आरक्त पीत वाटोळें | देखिले धरणीवरी || ६ ||

पूर्वेसी देखता तेथे | उडाले पावले बळे |
पाहिले देखिले हाती | गिळीले जाळीले बहु||७ ||

थुंकोनी टाकिता तेथे |युध्द झाले परोपरी |
उपरी ताडिला तेणे | एक नांवचि पावला || ८ ||

हा गिरी तो गिरी पाहे | गुप्त राहे तरुवरी |
मागुता प्रगटे धावे | झेपावे गगनोदरी || ९ ||

पळही राहीना कोठे | बळेची घालितो झडा |
कडाडा मोड़िती झाडे | वाड वाडे उलांड़िती || १० ||

पवनासारिखा धावे | वावरे विवरे बहु |
अपूर्व बाळळीला हे | रामदास्य करी पुढे || ११ ||

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.