रामदासांची हनुमानगाथा
हनुमानास नुसते वेशीवर न ठेवता मराठी जनमानसात स्थापण्याचे काम केले ते समर्थांनी(रामदास). मारुतीस्तोत्र, मारुतीची आरती(इतर अनेक देवतांच्या लोकप्रिय आरत्या समर्थांनी रचल्या) अनेक शतके महाराष्ट्रात घरोघरी मुखोद्गत आहेत.समर्थांच्या अफाट वाङ्मयात हनुमानाचे वर्णन अनेक ठिकाणी आढळते. ते एका संकेतस्थळावर असावेत ही इच्छा.
जय जय रघुवीर समर्थ!
स्तोत्र तिसरे
कोपला रुद्र जे काळीं | ते काळीं पाहावेचि ना |
बोलणे चालणे कैचें | ब्रहमकल्पांत मांडिला || १ ||
ब्रह्मांडाहून जो मोठा | स्थूळ उंच भयानकु |
पुच्छ तें मुरडिले माथा | पाऊल शून्य मंडळा || २ ||
त्याहून उंच वज्रांचा | सव्य बाहो उभारिला |
त्यापुढे दुसरा कैंचा | अद्भूत तुळणा नसे || ३ ||
मार्तंडमंडळा ऐसे | दोन्ही पिंगाक्ष पावले |
कर्करा घर्डिल्या दाढा | उभे रोमांच उठिले || ४ ||
अद्भुत गर्जना केली | मेघचि वोळिले भूमी |
तुटले गिरीचे गाभे | फुटले सिंधू आटले || ५ ||
अद्भूत वेष आवेशे | कोपला रणकर्कशू |
धर्म संस्थापनेसाठी | दास तो उठिला बळे || ६ ||
स्तोत्र चौथे
हनुमंता रामदूता वायुपुत्रा महाबला |
ब्रहमचारी कपीनाथा विश्वम्भरा जगत्पते || १||
कामांतका दानवारी शोकहारी दयानिधे |
महारुद्रा मुख्य प्राणा मूळमूर्ति पुरातना || २||
वज्रदेही सौख्यकारी भीमरूपा प्रभंजना |
पंचभूतां मूळमाया तूंचि कर्ता समस्तही|| ३||
स्थितरूपे तूंचि विष्णू संहारक पशूपती |
परात्परा स्वयंज्योति नामरूपा गुणातीता ||४||
सांगतां वर्णितां येना वेदशास्त्रा पडे ठका |
शेष तो शिणला भारी नेति नेति परा श्रृती || ५ ||
धन्यावतार कैसाल भक्तांलागिं परोपरी |
रामकाजीं उतावेळा भक्तां रक्षक सारथी || ६ ||
वारितों दुर्घटें मोठीं संकटीं धांवतो त्वरें |
दयाळ हा पूर्ण दाता नाम घेतांच पावतो || ७ ||
धीर वीर कपी मोठा मार्गें नव्हेचि सर्वथा |
उड्डाण अद्भुत ज्याचें लंघिले सागरजळा || ८ ||
देऊनी लिखिता हातीं नमस्कारी सितावरा |
वाचितां सौमित्र अंगें राम सूखें सुखावला || ९ ||
गर्जति स्वानंदमेळीं ब्रहमानंदें सकळही |
अपार महिमा मोठा ब्रह्मादीकांसि नाकळे || १० ||
अद्भुत पुच्छ तें कैसें भोवंडी नभपोकळी |
फाकंडें तेज तें भारी झांकिलें सूर्यमंडळा || ११||
देखतां रूप पै ज्याचें उड्डाण अद्भुत शोभलें |
ध्वजांत ऊर्ध्व तो बाहू वामहस्त कटीवरी || १२ ||
कसिली हेमकासोदी घंटा किंकिणी भोंवत्या |
मेखळे जडलीं मुक्तें दिव्य रत्नें परोपरी || १३ ||
माथा मुगुट तो कैसा कोटि चंद्रार्क लोपले |
कुंडलें दिव्य ती कानीं मुक्तामाला विराजते || १४ ||
केशर रेखिलें भाळीं मुख सुहास्य चांगलें |
मुद्रिका शोभती बोटीं कंकणें कर मंडित || १५ ||
चरणीं वाजती अंदू पदीं तोडर गर्जति |
कैवारी नाथ दीनांचा स्वामी कैवल्यदायकू || १६ ||
स्मरतां पाविजे मुक्ती जन्ममृत्यूसि वारितो |
कांपती दैत्य तेजासी भुभुकाराचिये बळें || १७ ||
पाडितो राक्षसू नेटें आपटी महिमंडळा |
सौमित्रप्राणदाताचि कपिकुळांत मंडणू || १८ ||
दंडिली पाताळशक्ती अहिमही निर्दाळिले |
सोडिलें रामचंद्रा कीर्ति ते भुवनतषरयीं || १९ ||
विख्यात ब्रीद तें कैसें मोक्षदाता चिरंजिवी |
कल्याण तयाचेनि नामें भूतपिशाच्च कांपती || २० ||
सर्पवृष्चिकपश्वादी विषशीतनिवारण |
आवडी स्मरतां भावें काळ कृतांत धाकतो || २१ ||
संकटें बंधनें बाधा दुुःखदारिद्रयनाशका |
ब्रह्मग्रहपिडाव्याधी ब्रह्महत्यादि पातकें || २२ ||
पूरवीं सकळही आशा भक्तकामकल्पतरू |
त्रिकाळी पठतां स्तोत्र इच्छिलें पावसी जनीं || २३ ||
परंतु पाहिजे भक्ती संधे काहीं धरूं नका |
रामदासा सहाकारी सांभाळितो पदोंपदीं || २४ ||