रामदासांची हनुमानगाथा
हनुमानास नुसते वेशीवर न ठेवता मराठी जनमानसात स्थापण्याचे काम केले ते समर्थांनी(रामदास). मारुतीस्तोत्र, मारुतीची आरती(इतर अनेक देवतांच्या लोकप्रिय आरत्या समर्थांनी रचल्या) अनेक शतके महाराष्ट्रात घरोघरी मुखोद्गत आहेत.समर्थांच्या अफाट वाङ्मयात हनुमानाचे वर्णन अनेक ठिकाणी आढळते. ते एका संकेतस्थळावर असावेत ही इच्छा.
जय जय रघुवीर समर्थ!
स्तोत्र पाचवे
अंजनीसुत प्रचंड | वज्र पुच्छ काळदंड |
शक्ती पाहतां वितंड | दैत्य मारिले उदंड || १ ||
धगधगीतसी कळा | वितंड शक्ती चंचळा |
चळचळीतसे लिळा | प्रचंड भीम आगळा || २ ||
उदंड वाढला असे | विराट धाकुटा दिसे |
त्यजूनि सूर्यमंडळा | नभांत भीम आगळा || ३ ||
लुळीत बाळकी लिळा | गिळोनि सूर्यमंडळा |
बहुत पोळतां क्षणीं | थुंकिलाचि तक्षणीं || ४ ||
धगधगीत बुबुळा | प्रत्यक्ष सूर्यमंडळा |
कराल कालमुख तो | रिपुकुळासी दुुःख तो || ५ ||
रूपें कपी अचाट हा | सुवर्णकट्टचास तो
फिरे उदास दास तो | खळाळ काळ भासतो ||६||
झळक झळक दामिनी| वितंड काळ कामिनी |
तयापरी झळाझळी | लुळीत रोमजावळी || ७ ||
समस्त प्राणनाथ रे | करी जना सनाथ रे |
अतूळ तुळणा नसे | अतूळ शक्ति विलसे || ८ ||
रूपे रसाळ बाळकू | समस्त चित्त चाळकू |
कपी परंतु ईश्वरु | विशेष लाधला वरु || ९ ||
स्वरूप क्षोभल्यावरी | तयासी कोण सावरी |
गुणागळा परोपरी | सतेज रूप ईश्वरी || १० ||
समर्थदास हा भला | कपीकुळात शोभला |
सुरारिकाळ क्षोभला | त्रिकुट जिंकिला भला || ११ ||
स्तोत्र सहावे
फणिवर उठवीला वेग अद्भूत केला | त्रिभुवनजनलोकीं कीर्तिचा घोष केला |
रघुपति उपकारें दाटलें थोर भारें | परम धिर उदारें रक्षिले सौख्यकारें ll१ll
सबळ दळ मिळालें युद्ध उदंड झालें | कपि कटक निमालें पाहता येश गेलें l
परदळशरणघातें कोटीच्या कोटी प्रेतें | अभिनवचरणपातें दुुःख बीभीषणातें ll२ll
कपिसिर घनदाटी जाहलीं थोर आटी । म्हणोनी जगजेठी धांवणें चारि कोटी ।
मृतिविरहित ठेले मोकळे सिद्ध झाले । सकळ जन निवाले धन्य सामर्थ्य चाले ।।३।।
बहु प्रिय रघुनाथा मुख्य तूं प्राणनाथा । उठविं मज अनाथा दूर सारून वेथा ।
झडकरि भिमराया तूं करीं दृढ काया । रघुविरभजना या लागवेगेंचि जाया ।।४।।
तुजविण मज पाहें पिता कोण आहे । म्हणउनि मन माझें रे तुझी वाट पाहे।
मज तुज निरवीले पाहिजे आठवीलें । सकळिक निजदासांलागि सांभाळवीलें ।।५।।
उचित हित करावें उद्धरावें धरावें । अनहित या करावें त्वां जनीं येश घ्यावें ।
अघटित घडवावें सेवकां सोडवावें । हरीभजन घडावें दुुःख तें वीघडावें ।।६।।
प्रभुवर विरराया जाहली वज्र काया । परदळ निवटाया दैत्यकूळें कुटाया ।
गिरिवर उलटाया रम्यवेषें नटाया । तुजचि अलगठाया ठेविलें मुख्य ठाया ।।७।।
बहुत सबळ सांठा मागतों अल्प वांटा । न करित हित कांटा थोर होईल ताठा ।
कृपणपण नसावें भव्य लोकीं दिसावें ।अनुदिन करुणेचें चिन्ह पोटीं वसावें ।।८।।
जळधर करुणेचा अंतरामाजि राहे । तरि तुज करुणा हे कां नये सांग पां हे ।
कठिण हृदय जालें काय कारुण्य गेलें । न पवसि मज कां रे म्यां तुझें काय केलें ।।९।।
वडिलपण करावें सेवकां सावरावें । अनहित न करावें तूर्त हातीं धरावें ।
निपटचि हटवादें प्रार्थिला शब्दभेदें । कपि घन करुणेचा वोळला रामवेधें ।।१०।।
बहुतचि करुणा या लोटली देवराया । सहजचि कफकेतें जाहलीं वज्र काया ।
परमसुख विलासे सर्व दासनुदासें । पवनतनुज तोषें वंदिला सावकाशें ।।११।।