महाराष्ट्र देश


ह्या मराठी माती बद्दल,ह्या महाराष्ट्र देशाबद्दल खूप लिहायचे असे अनेक वर्षे इच्छा होती,आहे !
खालील शब्द हे फक्त महाराष्ट्राचे एक धावते दर्शन घडवण्याच्या उद्देशाने लिहिले गेले आहेत.ह्या राष्ट्राच्या उत्तुंग कार्याचे यथार्थ तर सोडाच पण थोडके वर्णन सुद्धा करण्यास हे शब्द खुपच तोकडे आहेत !महाराष्ट्र दिनानिम्मित एका साध्या मराठी मुलाने साध्या शब्दात केलेले हे साधे वंदन आहे.

 
संतांचे पुण्य आणि शिकवण,
तारती कलियुगात पामरांना,
प्रपंच,परमार्थ,मोक्ष,राजकारण,
स्पर्शती आयुष्याच्या सर्वांगाना
 
अनंत,मिट्ट काळरात्र भेदीत,
सूर्य तेजाचे किरण आले,
नृशंस खलांचे शिर छेदीत
नृसिंह शिवछत्रपती आले
 
संगरतांडवसत्तावीस संवत्सर,
मराठी सत्तेचा अजस्त्र विस्तार,
सामर्थ्य,ऐश्वर्याचे अत्युच्च शिखर,
कौरव-पांडवास ही व्हावा मत्सर
 
राष्ट्रभावनेचीअथ – ज्योती,
तेवीते ह्या मातीच्या उरी,
पानिपताची ती रणाहुती,
तो स्वाभिमान तळपे भाळावरी
 
स्वातंत्र्यसंग्रामातबिनीला,
हाची प्रदेश झुंजला,
१८५७ पासून गोव्याला,
यानेच वाहिल्या नराहुतीच्या माला
 
गणरायाच्याआरत्यांचा गजर,
वारी मार्गस्थ श्रीक्षेत्र पंढरपुर,
खंडोबाच्या गोंधळाचा जागर,
जत्रेने भरीला जोतिबाचा डोंगुर
 
अष्टविनायक येथे स्थापित,
त्र्यंबकेश्वर मुक्त करी जीव शापित,
एकविरा,भवानी माता लक्ष राखीत,
ग्रामदैवते ही लोक पूजित
 
कुठेफड तमाशाचा,
कुठे गण अपरांतकाचा,
कुठे खेळ ढोल-लेझीमिचा,
तुतारी असे मान या मातीचा
 
परकरीपोरींचा खेळ फुगडीचा,
असे दबदबा नऊवारीचा,
दिमाख पहावा पैठणीचा,
ऐट,उठाव हिरव्या शालूचा
 
धोतर-उपरणेपुरोहित नेसती,
भरडी घोंगडी धनगर पांघरती,
दर्यासारंग रुमाल लेवती,
सुरवार-फेटे क्षत्रिय मिरविती
 
कुठेमाळराने मिळती क्षितिजास,
पहा ते बेलाग सह्यकडे,
ते जलधीतरंग चुंबिती किनाऱ्यास,
तर निबिड अरण्ये कुणीकडे
 
कुठेपुरणपोळीवर तुपाची धार,
कुठे चटणी आणि ज्वारीची भाकर,
कुठे खमंग थालिपीठ तव्यावर,
कुठे ठेच्याचा चटका जिभेवर
 
वडापावकोंबावा तोंडात,
वा मिसळ हाणावी झणझणीत,
पन्ह्याची शितलता उन्हात,
विपुल मेवा असे समुद्रात
 
असोइतिहास वा असे शिक्षण,
म्हणा चित्रपट वा घ्या संगीत,
क्रिडा असो व समाजपोषण,
सगळी क्षेत्रे केली पादाक्रांत
 
माणसेइथली साधी असती,
आपल्याच मातीत ती रमती,
सुज्ञ,सहिष्णू,मवाळ नीती,
इथे नसे कुणास भीती
 
ऋणापुढेपडावी कायम सेवा कमी,
ऐसा दैवी हा प्रदेश,
जन्मोजन्मांची जन्मभूमी,
असावा हा महाराष्ट्र देश !
 
जय हिंद ! जय महाराष्ट्र !

One thought on “महाराष्ट्र देश

Leave a reply to Suvarna Gupte Ranawade Cancel reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.