भेदिले सूर्यमंडळा

अगदी शाळेत असल्यापासून प्रदर्शनात पाहिलेली पण नुकतीच वाचलेली एक उत्तम कादंबरी. रामदास स्वामींच्या कौमाऱ्यापासून ते शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकापर्यंतचा प्रवास या कादंबरीत मांडला आहे.

– तळमळ होती तर नारायणाने मारुतीरायाप्रमाणे झेप घेतली, रामराया मार्ग दाखवेल असा ठाम विश्वास. राणू बाईंचा पुत्रमोह, गंगाधरपंतांचे थोरलेपण आणि पार्वतीचे मायाळू वहिनीपण आणि ठरेलेले लग्न या सगळ्यांचा मोह टाळून.
– मोहात अडकून पडणे नाही, मग ती स्थळे असोत वा व्यक्ती.
– निसर्ग हा सर्व संतांचा गुरू. एकांतात चिंतन आणि बळ मिळवण्यास संत निसर्गाचा आश्रय घेत. पुस्तकात रामदासांची महाराष्ट्र आणि उत्तर भारत यात्रा यातील वृक्ष, नद्या आणि इतर नैसर्गिक घटकांचे उल्लेख आहेत.
– समाजमन, चांगल्या आणि वाईट सवयी यांचे दर्शन उदाहरणार्थ दुष्काळ असला तरी याचकास उपाशी न ठेवणे, मठाच्या बांधकामासाठी श्रमदान. खाण्याचे पदार्थ उदा: कानवले, कडबू, कीर्तन झाले की सुंठवडा वाटणे. नाशिक, अयोध्या इथल्या तीर्थ क्षेत्रातील धर्माचा बाजार, मध्य व उत्तर भारतात होणाऱ्या लुटी, बलात्कार, हत्याकांडे आणि जाळपोळीच्या, मंदिरे पाडून त्या जागी मशिदी उभारायच्या अव्याहत घटना मांडल्या आहेत.

रामदासी जीवनाचा मागोवा:
– खडतर आयुष्य: सततचे शारीरिक आणि मानसिक श्रम, कठोर दिनचर्या, लोकांनी केलेले मान आणि अपमान सहन करणे. निर्जन आणि कठीण स्थळी राहणे, ४ मुष्टी शिध्यावर जगणे.
– लोकांत मिसळायचे तरी समुदायापासून दूर राहायचे, माणसातील त्रुटी दाखवायच्या पण  त्याची हेटाळणी करून स्वतः चा टेंभा मिरावयचा नाही, निवासाआधी गावकीची संमती, 
 जनसंचय: शिष्य ओळखणे व तयार करणे, नित्यनेमाने संपर्कात राहणे, देशाटन, तरुणांना बलाची उपासना शिकवणे आणि त्यास अध्यात्मिक बैठक देणे.
– हेरगिरी करण्यास शरीर, मन भक्कम करणे व मठांच्या रूपाने bases तयार करणे. ही यादी समर्थांनी दिवाकर मार्फत महाराजांना आग्रा भेटी आधी पोचती केली.
– सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे एकखांबी नेतृत्व न करता समर्थांनी ठिकठिकाणी नुसते शिष्य तयार केले नाही तर त्या शिष्यांना आणखी शिष्य तयार करायला सुद्धा शिकवले. हे भारताचे आजवर न सुटलले दुखणे आहे.

रामदासी उपदेश:
– प्रपंच म्हणजे भ्याडपणा नव्हे, त्याला पुरुषार्थाची जोड हवी.
– समर्थ स्वतः ब्रह्मचारी असले तरी त्यांनी आपल्या कुटुंबाशी संबंध तोडले नाहीत आणि मोहात अडकले सुद्धा नाहीत. 
– रूपकात्मक शैलीत सुलतानी अत्याचारांची वर्णने.
– समर्थांनी उत्तर भारताच्या यात्रेत व्यावहारिक निर्णय घेतला – समग्र भारताची चिंता न करता फक्त महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित करायचे.  
– बाल संस्कार. नुसता उडाणटप्पूपणा न करता तरुणाईला बळ आणि दिशा देण्याचे कार्य.
– महाराजांना पुरुषार्थ, दरारा राखण्याचा उपदेश.

इतर उपयुक्त माहिती:
– पैठणचे अनेक ब्राह्मण विद्वान काशीस स्थलांतरित झाले पण त्यांचा पैठणशी पक्का संपर्क होता. महाराष्ट्रातील घडामोडींची माहिती नियमितपणे मिळायची. गागाभट्टांचे घराणे त्यातलेच.
– काही विद्यांचे दर्शन: आयुर्वेदाचे आणि वनस्पतींचे ग्रंथ अभ्यासून समर्थ व्याधी दूर करतात. मूर्ति कशी घडवावी, डोंगर – कपाऱ्यात आडोसा व विस्तव कसा निर्माण करावा, मंदिर कसे बांधावे असे उल्लेख.
– तुकाराम – समर्थ, तुकाराम – शिवबा(तुकोबा महाराजांना रामदासांकडे पाठवतात) आणि शिवबा – समर्थ ही भेट पुन्हा वाचावी.

किमान प्रत्येक मराठी माणसाने अशी पुस्तके नियमित आणि पुनः पुन्हा वाचावीत.

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.