रामदासी साहकारी । सांभाळितो परोपरी ।।

रामदासांची हनुमानगाथा

हनुमानास नुसते वेशीवर न ठेवता मराठी जनमानसात स्थापण्याचे काम केले ते समर्थांनी(रामदास). मारुतीस्तोत्र, मारुतीची आरती(इतर अनेक देवतांच्या लोकप्रिय आरत्या समर्थांनी रचल्या) अनेक शतके महाराष्ट्रात घरोघरी मुखोद्गत आहेत.समर्थांच्या अफाट वाङ्मयात हनुमानाचे वर्णन अनेक ठिकाणी आढळते. ते एका संकेतस्थळावर असावेत ही इच्छा.

जय जय रघुवीर समर्थ!

अद्भुत पुच्छ ते कैसे । भोवंडी नभपोकळी । 
फाकले तेज ते भारी । झांकिले सूर्यमंडळा ।।

देखता रूप पैं ज्याचे । ठाण अद्भुत शोभले ।
ध्वजांग ऊर्ध्व तो बाहो । वाम हस्त कटावरी ।।

कांसिले हेम कांसोटी । घंटा किंकिण भोवत्या ।
मेखले जडिले मुक्त । दिव्यरत्न परोपरी ।।

माथा मुकुट तो कैसा । कोटि चंद्रार्क लोपले ।
कुंडले दिव्य ती कानी । मुक्तामाळा विराजती ।।

केशरे देखिले भाळी । मुख सुहास्य चांगले ।
मुद्रिका शोभती बोटी । कंकण करमंडित ।।

चरणीचे वाजती अंदू । पदी तोडर गर्जती ।
कैवारी नाथ दीनांचा । स्वामी कल्याण दायकू ।।

स्मरता पाविजे मुक्ति । जन्ममृत्यासि वारितो ।
कांपती दैत्य ते जासी । भुभुःकार देता बळे ।।

पाडितो राक्षस नेटे । आपटी महामंडळी ।
सुमित्र प्राणदाताच । कपिकुळात मंडणा ।।

दंडिली पाताळी शक्ति । अही मही निर्दाळीले । सोडिले रामचंद्राला । कीर्ति ही भुवनत्रयी ।।

विख्यात ब्रीद ते कैसे । मोक्षदाता चिरंजीव ।
कल्याण याचिये नामे । भूतपिशाच्च कांपती ।।

सर्प वृश्चिक श्वापदादी । विषसीत निवारीक ।
आवडी स्मरता भावे । काळ कृत्तांत कांपती ।।

संकटी विध्वंसितो बाधा । दुःख दारिद्र्य नासती । ब्रह्मग्रहपीडा व्याधि । ब्रह्महत्यादि पातकी ।।

पुरवितो सकळही आशा । भक्त काम कल्पतरू । त्रिकाळ पठता स्तोत्र । इच्छिले पाविजे जनी ।।

परंतु पाहिजे भक्ती । संदेह काही धरू नका ।
रामदासी साहकारी । सांभाळितो परोपरी ।।

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.